सारोळे ग्रामस्थांचे महावितरण केंद्राला निवेदन; वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी


मंगेश पवार

सारोळे, प्रतिनिधी : सारोळे गावातील ग्रामस्थांनी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने मिळणारी वीज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांबाबत महावितरण केंद्राला निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालय सारोळे यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या अनेक दिवसांपासून सारोळे गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून अनेक भागांमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. यामुळे घरगुती वापर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामकाज, शेतीसाठी लागणारी विद्युत उपकरणे तसेच लघुउद्योग व व्यावसायिक उपक्रमांवर गंभीर परिणाम होत आहे. वारंवार वीज खंडित होण्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही समस्येचे कायमस्वरूपी निराकरण होत नसल्याची नाराजी व्यक्त केली. त्यामुळे वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, सुपर लाईनची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच रोजच्या रोज वीजपुरवठा बंद न करता आठवड्यातून एक निश्चित दिवस ठरवून त्या दिवशी देखभाल व दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, गावातील वीज यंत्रणेची तपासणी करून कमी दाबाच्या समस्येवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना नियमित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हे निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, विक्रम मोरे, ओंकार महांगरे, अजय धाडवे, किरण पवार, सागर आवटे, योगेश धाडवे, विजय धाडवे, बंटी धाडवे, भास्कर धाडवे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजगड पोलीस स्टेशनचे मयूर निंबाळकर व इतर पोलीस कर्मचारीही उपस्थित होते.

दरम्यान, वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने शांततापूर्ण धरणे आंदोलन तसेच तीव्र निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे महावितरण प्रशासन या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे सारोळे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!