सारोळे येथे घरात घुसून ४१ हजारांची चोरी; दोन आरोपींना राजगड पोलिसांकडून अटक
सारोळे (ता. भोर) येथील निलेश धाडवे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या फिर्यादीच्या घरात घुसून मारहाण करत रोख रक्कम व इतर साहित्य चोरी करणाऱ्या दोन आरोपींना राजगड पोलिसांनी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 17 जून 2026 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सारोळे गावातील निलेश धाडवे यांच्या घरी फिर्यादी हे भाड्याने राहत होते. त्यावेळी तीन अनोळखी इसम जबरदस्तीने घरात घुसले. आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 41 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असताना राजगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान प्रतिक विलास कांबळे (वय 25, रा. भालेघर, ता. वाई, जि. सातारा) आणि बालाजी लक्ष्मण पवार (वय 18, रा. कासुर्डी, ता. भोर, जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन दि. 18 जून 2026 रोजी अटक करण्यात आली.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील तसेच पोलीस हवालदार निंबाळकर, मदने नाना, गव्हाणे आणि त्यांच्या पथकाने केली.


