पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जि.प. शाळांचा प्रवेशोत्सव ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू


भोर, प्रतिनिधी : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंद, बुवासाहेबवाडी आणि सणसवाडी येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात करण्यात आले.

प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. शाळेत आगमन झाल्यानंतर रांगोळी काढून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले तसेच कुंकवाचे पाऊल ठसे उमटवून गुलाबपुष्प देत त्यांच्या शालेय जीवनाची संस्मरणीय सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचेही वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंद येथे ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

ADVERTISEMENT

तसेच श्री स्वामी समर्थ व्हॉट्सअॅप ग्रुप यांच्या वतीने  संतोष कदम, नितीन गाडे आणि बाप्पा खाटपे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सणसवाडी येथील कार्यक्रमास मुख्याध्यापक कवितके सर, अशोक चव्हाण सर उपस्थित होते. शिंद शाळेत मुख्याध्यापिका रंजना पंधे व शिक्षिका  अश्विनी भडके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. बुवासाहेबवाडी येथील कार्यक्रमास मुख्याध्यापिका  जयश्री कांबळे व उपशिक्षिका  दिपाली शेडगे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रवेशोत्सव कार्यक्रम संस्मरणीय ठरल्याचे स्वामी सेवेकरी संतोष कदम यांनी सांगितले. अशा आगळ्यावेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!