सातारच्या जवानाला कर्तव्यावर वीरमरण, मुलाच्या पहिल्याच वाढदिवसानिमिंत्त येणार होते गावी!
अनुजा कारखेले-देवरे (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. जम्मू-काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यांतील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषे जवळील बुधवारी झालेल्या स्फोटात सातारा जिल्ह्यांतील कराड तालुक्यांतील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय 30) हे शहीद झाले आहेत अर्जुन जाधव यांनी भारतीय सैन्यदलात नऊ वर्ष सेवा बजावली आहे. त्यांच्यावर शुक्रवारी शहापूर येथे शासकीय मानवंदना देवुन जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार होणार आहेत. जवान अर्जुन जाधव हे 15 जूनला आपल्या पहिल्या मुलाच्या वाढदिवसानिमिंत्त गावी येणार होते. कुटुंब देखील त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होतं. मात्र मुलाच्या वाढदिवसांचा आनंद साजरा करण्यापूर्वींच ते शहीद झाल्याची बातमी धडकल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहीद जवान अर्जुन यांच्या पश्चांत आई-वडील दोन विवाहित बहिणी पत्नी आणि एक वर्षाचा मुलगा हर्षल असा परिवार आहे. शहीद जवान अर्जुन जाधव यांच्या जाण्यामुळे जाधव कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे, आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याचे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले, जाधव कुटुंबासह जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

