नसरापूरमध्ये सराफा दुकानातून ६२ हजारांच्या सोन्याच्या चमक्या लंपास; पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल
नसरापूर :- राजगड पोलीस स्टेशन हद्दीत नसरापूर येथील एका सराफा दुकानातून सुमारे ६२ हजार रुपयांच्या सोन्याच्या चमक्या चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनय मिलिंद पंडीत (वय ३१, व्यवसाय सोनार, रा. नसरापूर, ता. भोर) यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. दिनांक १३ मे २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नसरापूर येथील “पंडीत ज्वेलर्स” दुकानात पाच अनोळखी महिला व त्यांच्यासोबत एक लहान मुलगा आले होते. त्या वेळी दुकानात ग्राहकांची गर्दी होती.
फिर्यादी व त्यांची आई ग्राहकांना सोन्याच्या चमक्या दाखवत असताना, महिलांपैकी काहींनी बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच दरम्यान एका महिलेने काउंटरवरील दोन पाकिटे दुसऱ्या महिलेच्या हातात दिली. पुढे ती पाकिटे सोबत असलेल्या लहान मुलाकडे देण्यात आली. त्यानंतर कोणतीही खरेदी न करता संबंधित महिला दुकानातून निघून गेल्या.
नंतर तपासणी केली असता, ३० हजार रुपये किंमतीचे ६० सोन्याच्या चमक्यांचे पाकीट तसेच ३२ हजार रुपये किंमतीचे २४ सोन्याच्या फॅन्सी चमक्यांचे पाकीट असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तळपे करीत आहेत.


