विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; भोरसह ७ तालुक्यांतील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांची सुट्टी
पुणे, दि. ६ जुलै : भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी (Thunderstorm and Lightning) चा इशारा देत रेड अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वाचा आदेश काढला आहे.
या आदेशानुसार ७ जुलै २०२६ (मंगळवार) रोजी जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या तालुक्यांतील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच सर्व अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी नदी-नाले, धबधबे आणि पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाची कामे करावीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


