चेलाडी फाटा येथे राजगड पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात जनजागृती अभियान
नसरापूर , दि. 26 जून : अमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजगड पोलीस स्टेशनच्या वतीने शुक्रवार (दि. 26 जून) रोजी सकाळी 11.00 ते 11.30 या वेळेत चेलाडी फाटा येथे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले.
यावेळी पोलिसांनी नागरिकांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यांचे सेवन केल्याने होणारे सामाजिक व कायदेशीर परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अमली पदार्थांची खरेदी-विक्री, उत्पादन अथवा साठा होत असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ राजगड पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन करण्यात आले.
अमली पदार्थांचे सेवन, विक्री किंवा उत्पादन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला. नागरिकांनी अशा कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित डायल 112, राजगड पोलीस स्टेशन किंवा प्रभारी अधिकाऱ्यांना देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
हे जनजागृती अभियान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र गौर (भोर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या अभियानात पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस अंमलदार समीर भालेराव आणि अनिकेत गुरव यांनी नागरिकांना अमली पदार्थांविरोधात जागरूक करत कायद्याची माहिती दिली.
राजगड पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून, अमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


