भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उंबरे येथे महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम


भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उंबरे येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेत एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आईला उद्देशून “थँक्स यू” आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देणारी पत्रे लिहून कृतज्ञता व्यक्त केली.
या उपक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. “आई तू माझ्यासाठी खूप कष्ट करतेस”, “मला रोज शाळेत पाठवतेस, अभ्यास घ्याते”, “माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद” अशा भावना व्यक्त करणारी पत्रे मुलांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या पत्रांमध्ये आईबद्दलचे प्रेम व्यक्त करत सुंदर चित्रेही काढली.
मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. समाजातील महिलांचे योगदान, त्यांचा त्याग आणि कुटुंबातील भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आईबद्दल आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा विकास होऊन कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतात, असे मत व्यक्त करण्यात आले.
महिला दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण भावनिक आणि प्रेरणादायी झाले होते. विद्यार्थ्यांच्या निरागस शब्दांतून आईबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त होत असल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!