नसरापूर प्रकरणात मोठा खुलासा! आरोपीला ओळखणाऱ्या तीन मुलांची न्यायालयात साक्ष
भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीवर न्यायालयाने दोष निश्चिती (चार्ज फ्रेम) केली असून खटल्याच्या सुनावणीदरम्यान तीन अल्पवयीन मुलांनी निर्भीडपणे प्रत्यक्षदर्शी साक्ष दिली आहे.
घटनेच्या दिवशी ही तीन मुले परिसरात खेळत असताना आरोपी पीडित चिमुकलीला गोठ्याशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये जबरदस्तीने नेत असल्याचे त्यांनी पाहिले होते. तसेच गोठ्याच्या फटीतून पाहताना आरोपी संशयास्पद स्थितीत दिसल्याचे मुलांनी सांगितले. आपल्याला पाहिले जात असल्याचा संशय आल्याने आरोपीने मुलांवर दगडफेक केल्याचाही दावा साक्षीत करण्यात आला आहे.
विशेष सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील ओळख परेड तसेच न्यायालयीन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या तिन्ही मुलांनी आरोपीची स्पष्ट ओळख पटवली. न्यायालयात कोणतीही भीती न बाळगता दिलेली त्यांची साक्ष खटल्याच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या प्रकरणात एकूण ८२ साक्षीदार असून त्यापैकी १६ प्रमुख साक्षीदारांची साक्ष आतापर्यंत नोंदवण्यात आली आहे.
काय होती घटना?
१ मे रोजी नसरापूर येथे घरासमोर खेळत असलेल्या एका चिमुकलीवर ६५ वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी तिची हत्या करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवल्याचा आरोप पोलिस तपासात समोर आला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
तपासादरम्यान मिळालेली सीसीटीव्ही फुटेज, वैज्ञानिक पुरावे आणि तीन धाडसी बालसाक्षीदारांची साक्ष यामुळे आरोपीविरोधातील पुरावे अधिक भक्कम झाल्याचे मानले जात आहे. आता या बहुचर्चित प्रकरणातील पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


