रौप्यमहोत्सवी वर्षातील श्री संत सावता महाराज दिंडीचे लोणंद येथून आळंदीकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान
संपादक दिलीप वाघमारे
लोणंद, ता. खंडाळा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी लोणंद येथील श्री संत सावता महाराज दिंडीचे सावता महाराज मंदिरातून भक्तिमय वातावरणात आळंदीकडे प्रस्थान झाले. यावेळी श्री महेश अमृत क्षीरसागर यांच्या हस्ते श्रींची आरती करून दिंडीला शुभारंभ करण्यात आला.
यावेळी दिंडी प्रमुख ह.भ.प. श्री सुधाकर महाराज क्षीरसागर (मांढरदेव) यांनी दिंडीच्या नियोजनाची माहिती देताना सांगितले की, यंदा दिंडीचे रौप्यमहोत्सवी (२५वे) वर्ष असून, सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांकडून कोणताही खर्च न घेता सर्व सुविधा श्री संत सावता महाराज सेवाभावी संस्था, लोणंद यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी भक्तनिवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
स्वर्गीय अमृत अण्णा क्षीरसागर यांनी सुरू केलेल्या या दिंडीला यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून, वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे शुद्ध पाणी, पाण्याच्या बाटल्या तसेच महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र स्नानगृह व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या दिंडीच्या आयोजनासाठी श्री दिनकर दादा दहिफळे (मा. उपाध्यक्ष, जि.प. नांदेड), श्री स्वप्नील क्षीरसागर, श्री दीपक दादा शेळके, श्री अतुल डोईफोडे, श्री अनिल नाना रांजणे, सौ. वैशाली भोसले, श्री रामचंद्र जाधव, सौ. भारती राऊत, श्री भाकर झांजुर्णे, श्री मोहन जेधे आणि श्री सुभाष शेळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
अध्यक्ष श्री महादेव (बंडा) क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे नियोजन करण्यात आले असून, दिंडी यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक परिश्रम घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


