टेनिस क्रिकेटला राज्यमान्यता; भोंगवलीचे सुपुत्र उदय शिंदे यांची पुणे सेक्रेटरीपदी निवड
मंगेश पवार
भोर : टेनिस क्रिकेट खेळाला राज्यस्तरावर राज्यमान्यता मिळाल्याने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑल इंडिया टेनिस क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट संघटनाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
दरम्यान, भोर तालुक्यातील भोंगवली गावचे सुपुत्र उदय शिंदे यांची टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन पुणेच्या सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे भोर तालुक्यासह ग्रामीण भागातील खेळाडूंना नवी दिशा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्यमान्यता मिळाल्यामुळे टेनिस क्रिकेट स्पर्धांना अधिकृत स्वरूप प्राप्त होणार असून, खेळाडूंना शासकीय क्रीडा योजनांचा लाभ, शालेय व महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये संधी तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणार आहे.
उदय शिंदे यांनी आपल्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “भोर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटला संघटित रूप देऊन अधिकाधिक स्पर्धा आयोजित करण्यावर भर दिला जाईल. नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातील.”
भोंगवली गावासह भोर तालुक्यात त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून, विविध सामाजिक व क्रीडा संस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टेनिस क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेला आता अधिकृत मान्यता मिळाल्याने हा खेळ नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


