भोंगवलीतील बेकायदेशीर उत्खननाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; कारवाईचे संकेत
भोर :- भोंगवली गावातील विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी भोंगवली गावातील सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खनन, आरएमसी (RMC) प्रकल्पामुळे होणारे परिणाम, तसेच गावात प्रस्तावित नव्या प्रकल्पाला ग्रामस्थांकडून होत असलेला विरोध या विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. याशिवाय दत्तगड देवस्थानाला ‘क’ दर्जा मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली.
ग्रामस्थांच्या भावना, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिकांच्या अडचणी याबाबत सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व बाबींची गंभीर दखल घेत संबंधित विभागांकडून चौकशी करून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांनी भोंगवली ग्रामस्थांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच गावाच्या विकासासह पर्यावरण आणि धार्मिक स्थळांच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्रशासनाने योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.


