शिंदेवाडीत मोठ्या प्रमाणावर जुगार अड्ड्यावर छापा; 30 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
राजगड पोलीस स्टेशनच्या पथकाने शिंदेवाडी परिसरात मोठी कारवाई करत सोरट नावाचा जुगार खेळविणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 30 लाख 65 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी सायंकाळी सुमारे 5.50 वाजण्याच्या सुमारास मौजे शिंदेवाडी, ता. भोर येथील जुन्या पुणे-सातारा रोडलगत हॉटेल आमराईच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही व्यक्ती सोरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत सचिन अंकुश बागल, मनोज दिनकर काळाणे, सशांक मच्छिंद्र मेमाणे, गणेश पांडुरंग वाळुंज, धनाजी राजाभाऊ जाधव आणि निखिल रामचंद्र तुगंतकर यांना ताब्यात घेण्यात आले. तर अन्य 10 ते 12 जण घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छाप्यात जुगारासाठी वापरण्यात येणारे डिजिटल सोरट मशीन, टेबल, खुर्च्या, चार्ट, वह्या, स्लिपा, मोबाईल फोन, जुगाराचे टोकन, रोख रक्कम तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने असा एकूण 30,65,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पप्पु रामा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. 225/2026 अंतर्गत महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.


