“पुत्र व्हावा ऐसा त्याचा त्रैलोकी झेंडा” नितीन कुमार भरगुडे पाटील वाढदिवस अभिष्टचिंतन.


 

दि. १३ खंडाळा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे

या सुभाषिताप्रमाणे खंडाळा तालुक्याचे माजी लोकप्रिय सभापती कै.लक्ष्मणराव भरगुडे पाटील उर्फ भाऊ यांच्या पोटी

नितीनकुमार लक्ष्मणराव भरगुडे पाटील हे रत्न जन्माला आले.

“शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी”

या उक्तीप्रमाणे बापूंना राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्याचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला.तो तसाच पुढे अखंडपणे चालू ठेवण्याचा प्रयत्न बापूंनी उभ्या आयुष्यामध्ये केला. बापूंनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व आपले वडील कै.लक्ष्मणराव भरगुडे पाटील उर्फ भाऊ यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बापू काम करत आहेत. बापूंनी आपल्या कार्याची सुरुवात पळशी गावचे दूध संकलन केंद्र या छोट्या कामापासून केली.खंडाळा तालुका दूध संघाचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य,खंडाळा पंचायत समितीचे सर्वात कमी वय असलेले राज्यातील पहिले सभापती,खंडाळा तालुका साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीचे सभापती व सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशी अनेक मोठी पदे त्यांनी अतिशय दिमाखदारपणे भूषवून प्रत्येक पदाला न्याय देणे,त्या पदाची उंची,मान,सन्मान वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

दूध संघावर काम करत असताना.पारदर्शक कारभार व दुधाला योग्य भाव यामुळे दूध संघ तालुक्यात प्रथम क्रमांकाचा दूध संघ ठरला.खंडाळा पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम करताना गोरगरीब लोकांच्या अडी-अडचणी सोडविणे, सरकारी योजनांचा सामान्य लोकांना लाभ मिळवून देणे,रस्ते,पाणीपुरवठा,आरोग्य, शिक्षण व सार्वजनिक सभागृह यासारख्या मूलभूत गरजा त्यांनी पूर्ण केल्या.

या कामांसोबत खंडाळा पंचायत समिती जिल्ह्यात आदर्श करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सातारा जिल्हा परिषद सदस्य, शिक्षण व अर्थ समिती सभापती व उपाध्यक्ष ही जिल्ह्यातील मोठी पदे भूषविताना बेटी बचाव बेटी पढाव,हनिमून पॅकेज,शैक्षणिक सुविधा,डोंगराळ भागातील रस्ते, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यासारख्या योजना राबविल्याने त्यांच्या कारकिर्दीत सातारा जिल्हा परिषदेस राज्यात प्रथम क्रमांकाची जिल्हा परिषद होण्याचा सन्मान मिळाला. भारतातील आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगाव येथील आपली उपस्थिती व सूत्रसंचालन तसेच मांढरदेवीच्या रस्त्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न हे आजही जनतेच्या मनात घर करून राहिलेले आहे.बापूंच्या कामाचा आवाका, काम करण्याची पद्धत, पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी असलेले सहसंबंध, वकृत्व कलेच्या जोरावर जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांची गाजलेली भाषणे,निवडणुक प्रचार व इतर कार्यक्रमांतील त्यांच्या वर्तमानपत्रात मोठमोठ्या बातम्या येऊन पत्रकारांनी त्यांना जिल्हा परिषदेमधील गोंगावणारे वादळ व मुलुख मैदानी तोफ अशा उपाध्या देऊन त्यांचा गौरव केला.

ADVERTISEMENT

बापूंची भाषणे ही दर्जेदार, अभ्यासू,मनोरंजक व उद्बोधन करून सभा गाजविणारी असायची.

“घार उडे आकाशी लक्ष तिचे पिलापाशी”

या उक्तीप्रमाणे बापूंनी आपल्या पळशी गावाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही.गावाचा विकास सुद्धा त्यांनी सर्व सोयींनी युक्त असे आदर्श गाव म्हणून केलेला आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे सन २०१० साली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण महिला होते त्यावेळी बापूंनी ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व सदस्य पदावर महिला सदस्यांची नेमणूक करून राज्याला एक वेगळा आदर्श घालून दिला.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी आपल्या गावाला भेट देऊन राज्यातील एक आदर्श गाव म्हणून आपल्या पळशी गावचे कौतुक केले.बापूंच्या पुढाकाराने व सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये कोणतीही निवडणूक होऊ न देणे,एक गाव एक गणपती,सामुदायिक विवाह सोहळा,लग्न वेळेत लावणे, लग्नाची वरात न काढणे, गावामध्ये डॉल्बी न वाजवणे, सार्वजनिक फ्लेक्स न लावणे, गावामध्ये एकत्र बसून भांडण तंटा मिटवणे म्हणजे लोक न्यायालय,आपल्या वडिलांची पुण्यतिथी गेली ४२ वर्षे अखंडितपणे साजरे करणे, कोरोना काळात लोकांना मार्गदर्शन, जनजागृती व मदत,आठवडा बाजार यासारख्या योजना राबवून पळशी गाव हे राज्याला एक दिशा देणारे गाव बापूंनी बनवले आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक संकटे,दुःख व आजारपण आले. पण या सर्वांना धैर्याने व खंबीरपणे तोंड देत आपली सर्व दुःख स्वतःच्या मनामध्ये ठेवून आपल्या कार्यकर्त्यांना दिलासा देणारे वेगळेच उदाहरण म्हणजे बापू अशा प्रकारे नेतृत्व,कर्तृत्व आणि वकृत्व असलेले, सर्वगुणसंपन्न,अष्टपैलू, बहुआयामी,अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेल्या बापूंना भविष्यात एखादे विधान परिषद सदस्य किंवा एखादे मोठे पद मिळो व बापूंचे यापुढील आयुष्य सुखाचे,समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे व उत्तम आरोग्याचे जावो.त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वरचरणी,सिद्धेश्वर चरणी मनापासून प्रार्थना करून त्यांना वाढदिवसाच्या मनापासून कोटी कोटी शुभेच्छा!

 

शब्दांकन :श्री राजू नारायण भरगुडे रा.पळशी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!