भोरला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पेच कायम गणेश पवार संजय जगताप यांच्यामध्ये रस्सीखेच; गणेश पवारांचे पारडे जड
मंगेश पवार
भोर शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू भोरला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे घड्याळ विरुद्ध भाजपाचे कमळ अशीच लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून उमेदवारांचे मुलाखतींचे सत्र सुरू असून दोन्ही पक्षांच्या कार्यालयात उमेदवार मोठ्या संख्येने गर्दी करून मुलाखती देत आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस पक्ष यावेळी मात्र हद्दपार असल्याचे दिसून येत आहे. संग्राम थोपटे यांच्या प्रवेशामुळे पूर्वीचे काँग्रेसचे नगरसेवक भाजपमध्ये आल्याने सध्या भाजपचे पारडे जड आहे .तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अ प)पक्षात अनेकांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीची शहरात देखील मोठी ताकद वाढली आहे. दोन्ही पक्ष मात्र कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असणार आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवून असून त्याप्रमाणेच तिकीट वाटप करणार असल्याचे दिसत आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजप पक्षाकडून गणेश पवार व संजय जगताप या दोन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असून आजी माजी आमदारांच्या पक्षातील उमेदवारांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठीचा पेच कायम असून भाजपाच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे .
भोर शहरात नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे त्यामुळे सध्या गणेश पवारांचे सामाजिक ,राजकीय, आर्थिक अशा सर्व बाजूंनी पारडे जड असल्याची चर्चा भोर शहरात सुरू आहे.पवार घराणे हे पुर्वीपासून राजकीय वारसा पुढे चालवत नगर परिषदेमधुन नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. गणेश पवारांचे चुलते स्वर्गिय शंकरतात्या पवार पंधरा वर्षे नगरसेवक , उपनगराध्यक्ष, गटनेते राहिले होते. त्यांचाही मोठा जनसंपर्क होता. तर गणेश पवार यांनीही मागील पंचवार्षिकला नगरसेवक व उपनगराध्यक्ष, गटनेते पद भूषविले आहे.त्यांनी आपल्या प्रभागात व शहरात मोठ्या प्रमाणात संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे केली आहेत.पवारांना शहरातील जनतेचा मोठा पाठिंबा आहे व पवार घराण्याचे मोठा नातेसंबंध असल्याने मतदारांचा मोठा वाढता पाठिंबा झाला त्यांना मिळाला आहे.
मागील काळात त्यांनी रस्ते, वीज, पाणी, पाइपलाइन अशा नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत विकास कामे केली आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप , गरजूंना आर्थिक मदत तसेच गणेशोत्सव नवरात्र काळात मंडळांना विशेष भेटवस्तू, दिवाळी फराळ वाटप, बक्षिसे वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आरोग्य शिबीरे या सर्व क्षेत्रात भरीव मदत केली आहे.पवार हे शहरातील तरुण वर्गातील नेतृत्व करणारे युवक असुन तरुणांचा मोठा शहरातून पाठिंबा असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहेत. शहरातून भाजपाकडून गणेश पवार विरुद्ध राष्ट्रवादीकडून रामचंद्र आवारे हीच मात्तबर लढत होणार की काय ? अशी सर्वांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

