भोंगवलीच्या वृद्धाचा जांभळी येथे हॉटेलमध्ये खून; कामगारावर संशय
भोर तालुक्यातील जांभळी गावाच्या हद्दीत नसरापूर–वेल्हा रोडलगत असलेल्या हॉटेलमध्ये एका वृद्धाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल सखाराम रसाळ (वय 48, रा. जांभळी, ता. भोर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीच्या “7/12 शेतकरी व्हेज-नॉनव्हेज हॉटेल”मध्ये त्यांचे सासरे किसन बापू सुर्वे (वय 75) हे रात्री झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर बोथट हत्याराने वार करून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
ही घटना दि. 24 मार्च 2026 रोजी रात्री 11.00 ते दि. 25 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 वाजण्याच्या दरम्यान घडली असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी सागर थापा (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) या हॉटेलमधील कामगारावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. मोबाईल देण्याच्या कारणावरून राग मनात धरून त्याने ही घटना घडवून आणली असावी, असा फिर्यादीचा आरोप आहे.
या घटनेप्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 126/2026, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद दि. 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.55 वाजता करण्यात आली.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड तपास करत असून पोलीस नाईक इंगळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.


