लोणंद पालखी तळ पाहणीदरम्यान वॉल कंपाऊंड प्रस्तावावर आक्षेप; प्रशासनाला काम थांबवण्याचे निर्देश


दिलीप वाघमारे

लोणंद : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी संस्थानचे विश्वस्त व सोहळा प्रमुख यांनी आज लोणंद येथील पालखी तळाची पाहणी केली. यावेळी वाई प्रांत कार्यालय, खंडाळा तहसीलदार तसेच लोणंद नगरपंचायत प्रशासन उपस्थित होते.

पाहणीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते यशवंत दणाने, जमीर शेख व सुजित पवार यांनी प्रभाग क्र. १४ मधील सर्वे क्र. ४/पै या जागेबाबत गंभीर आक्षेप नोंदवले. संबंधित जागा ही कायमस्वरूपी पालखी तळासाठी आरक्षित असताना, नगरपंचायत व प्रशासनाकडून अतिक्रमण करून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून सुमारे ५० लाख रुपयांची मंजुरी मिळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

ADVERTISEMENT

या पार्श्वभूमीवर, वारकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आणून देत संबंधित काम तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. यावर पालखी सोहळा विश्वस्त व प्रमुखांनी नगरपंचायत प्रशासनावर ताशेरे ओढत उपविभागीय अधिकारी (प्रांत, वाई) व लोणंद नगरपंचायत यांना वॉल कंपाऊंडचे काम न करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

सदर जागेवर पालखी सोहळ्यावेळी सुमारे ४० ते ५० वारकऱ्यांचे तंबू उभारले जातात. वॉल कंपाऊंड झाल्यास वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच, ही जागा पालखी संस्थानासाठी आरक्षित असल्याने वारकरी व भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच वाहतूक व रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये, याबाबतही विश्वस्तांनी सूचना केल्या.

यावेळी पालखी सोहळा प्रमुखांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती देत योग्य तो निर्णय घेण्याची विनंती केली.

पाहणीदरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पालखी सोहळा विश्वस्त व प्रमुखांचे आभार “मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!