शिरवळ ऐतिहासिक गाव ते औद्योगिकनगरी


खंडाळा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे

शिरवळ हे सातारा जिल्ह्याचे उत्तरेचे प्रवेशद्वार पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर व महाड- पंढरपूर मार्गावरचे प्रमुख ठिकाण. पुणे व सातारा यापासून साधारणपणे समान अंतरावर. शिरवळची सद्यस्थितीतील भुक्षेत्र हे ५४७ हेक्टर असून चल व अचल लोकसंख्या ४० हजाराहून अधिक आहे साधारणपणे २४ मोठे उद्योगधंदे असून५०० छोटे मोठे व्यावसायिक आहेत.

शिवपूर्वकाळात मावळ खो-यात प्राचीन देशमुखांची घराणी होती.त्यांनीच हा परिसर वसवला आजच्या शिरवळची निर्मिती १४ व्या शतकातील. संस्कृती नदीच्या काठाने बहरतात.व सांस्कृतिक संचित सुद्धा नदीमुळे वाढते. कानंदी , गुंजवणी ,वेळवंडी, शिवगंगा व निरा या पंचनाद्यांच्या पाण्याच्या व धान्याच्या समृद्धीने संपन्न असा हा परिसर. तत्कालीन राज्यकर्त्यांनी दूरदृष्टीने वसवला होता. इ.स.१४७० साली गावच्या चित्रबेट या ठिकाणी सुभानमंगल या भुईकोट किल्ल्याची बांधकाम सुरू झाली ते १५१५ साली पूर्ण झाले‌ विजापूरच्या आदिलशाही, अहमदनगरच्या निजामशाही व ब बेदरच्या ईमादशाही यांनी स्थानिकांच्या आश्रयाने राज्यशकट हाकले.गावाच्या नजीकच चोपाळा येथे पुरातन पाणपोईही आहे शिरवळ गावचे जुने नाव श्रीमाळ श्री म्हणजे साक्षात लक्ष्मीची कृपा‌ गाव निगडे देशमुख ,मांडके ,देशपांडे मोने ,वाळिंबे,काझी नायकवडी, शेटे ,महाजन हे इथले मूळनिवासी होतं.

 

नंतरच्या काळात भोर संस्थानमधील विचित्रगड तालुक्यातील हे मोठे गाव होते तालुक्याचे कार्यालय या ठिकाणी होती संस्थानकालीन जुन्या इमारती आजही अस्तित्वात आहेत याच इमारतीत काही काळ शाळा, पोलीस कचेरी ग्रामपंचायत याचा कारभार चालत होता तर ब्रिटिशकालीन गावांमधील डाकबंगला प्रशस्त. सद्यस्थितीत मध्यभागी व प्रशासकीय कुशलतेची साक्ष देणारा असा आहे.

 

गाव धार्मिक बाबतीत ही पुरातन व अग्रेसर त्यामुळे गावात मंदिरांची मांदियाळी यामध्ये प्रामुख्याने अंबाबाई मंदिर‌ ही गावची ग्रामदेवता वैशाख महिन्यात येथे अक्षय तृतीया उत्सव म्हणजेच गावची यात्रा ही भरते.

केदारेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर या मंदिरातून सुभान मंगल किल्ल्यावर किल्ल्यावर जाण्यासाठी भुयारी मार्ग होता असा उल्लेख आढळतो मंडाई माता,मुदाई देवी व रामेश्वर ही मंदिरे नदीतटी दिसून येतात शिरवळ ही अमृतवाहिनी निरामातेचे लाडके लेकरू तिच्या अंगा- खांद्यावर वाढलेले यामुळे निरामातेचे मंदिर साहजिकच परंतु ते वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लुप्त झाले आहे गावापासून पश्चिमेला साधारण ३-४ किलोमीटर अंतरावर उपयुक्त पांडवकालीन सुंदर लेणी दिसून येतात.

शिरवळ ग्रामपंचायतची निर्मिती झाल्यानंतर प्रथम सरपंच होण्याचा मान कै.पांडुरंग तांबे यांना मिळाला तर प्रदीर्घकाळ सरपंच होण्याचा मार्ग डाह्याभाई जोशी यांना मिळाला त्यांच्याच काळात शिरवळच्या औद्योगीकरणाची मुहूर्त मेढ रोवण्यात आली त्यानंतरच्या काळात गावची सरपंच श्री. आप्पासाहेब देशमुख हे ही दीर्घकाळ सरपंच होते श्री.गुरुदेव बरदाडे यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत ची स्थलांतर ग्रामवैभव या कार्यालयातीन इमारतीत झाले.प्रथम महिला सरपंच पदाचा मान अंजुताई बधे यांना मिळाला राजेंद्र तांबे, दत्तात्रय कुंभार ,दत्तात्रय रांगोळी ,अंकुश पवार छायाताई जाधव या सरपंचांनी आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटवला उपसरपंच व पंचायत समिती सदस्य राहिलेले रवींद्र पानसरे यांची यांनी आपल्या कल्पकतेने व प्रयत्नाने महाराष्ट्रात आदर्शवत कैलास स्मशानभूमीची उभारणी केली तसेच श्री.छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची संकल्पना ही त्यांचीच.सद्यस्थितीत रविराज दुधगावकर हे तरुण व सर्व समावेशक नेतृत्ल ग्रामपंचायतीला मिळाले आहे खंडाळा तालुका सभापती होण्याचा मान गुरुदेव बरदाडेराजेंद्र तांबे यांना मिळाला तर शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ते उदय कबुले यांच्या रूपाने प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा सन्मान मिळाला होता.

शैक्षणिक सुविधाही गावात उत्तम आहेत प्राथमिक शाळा ही १८६४ साली स्थापन झाली तसेच स्वतंत्ररीत्या कन्या शाळेची निर्मिती सन १९६७ साली झाली नंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या सुर्योदयच्या वर्षात१९४७ साली गावातील प्रतिष्ठित डॉ.रा.शं. वाळिंबे,डी.जी. कुलकर्णी,पांडुरंग कांबळे,गेनबा वैद्य या कैलासवासी मंडळींनी आदर्श शिक्षण समितीद्वारे आदर्श विद्यालयाची स्थापना केली कालांतराने आलेल्या अडचणीमुळे ही शाळा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्थेला जोडली गेली याच आदर्श विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. राम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य बिरबल शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील नेते मंडळींना बरोबर घेउन तालुक्यात जून १९८३ मध्ये खंडाळा तालुक्यात प्रथमच ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रीपतराव कदम महाविद्यालयाची निर्मिती केली दि. १२/१२/१९८८.रोजी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच केंद्र शासनाच्या

पशुवैद्यकीय महाविद्यालयचा शुभारंभ करण्यात आला दरम्यानच्या काळात डॉ विनय जोगळेकर ,रमेश देशपांडे जोशी ईश्वर भाई जोशी या रोटरीयन्सनी दर्जेदार परिपूर्ण व संस्कारक्षम शिक्षणासाठी ज्ञानसंवर्धनी संकुलाची सुरुवात केली प्रगती स्कूल स,एम ई एस इंग्रजी माध्यम शाळा व अशा अनेक लहान मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा गावात आहेत.

राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रात शिरवळ चे नाव सर्वदुर होत असतानाच डाॅ.मोरेश्वर अंतुरकर यांनी गावामध्ये सर्व प्रथम शिरवळ निमनागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. शिवप्रेरणा,ज्ञानसंवर्धिनी,छत्रपती संभाजी व इतर बाहेरून आलेल्या पतसंस्थेचे जाळे सध्या गावात आहे सांस्कृतिक महोत्सवाची परंपरा आहे गावाला मोठी आहे कै.हरिभाऊ भापकर यांनी सुरू केलेला शिवमहोत्सव त्यांचे चिरंजीव आदेश भापकर यांनी जोमाने सुरू ठेवला आहे शारदीय नवरात्र उत्सव,निरामाता उत्सव असे अनेक उत्सव सुरू असतात.वैचारिक मशागतीसाठी वसंत व्याख्यानमाला हा उपक्रम सुरू आहे तर रामदास मोफत वाचनालयाने ७०.वर्ष नुकतेच केली आहेत.

क्रीडा क्षेत्रातही गाव अग्रेसर आहे जयभवानी क्रीडा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात यामध्ये खान बंधु व कुचेकर बंधू यांचे योगदान महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे श्री. शिवछत्रपती प्रतिष्ठानने यापूर्वी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच मॅरेथॉन स्पर्धा यांचे आयोजन केले होते अलीकडच्या काळामध्ये डॉ.विजय शिंदे ,प्रा.डाॅ.गणेश भुतकर व त्यांच्या सहका-यांनी एकत्रित येऊन शिरवळ जिमखान्याची स्थापना केली व यामध्ये प्रामुख्याने बॅडमिंटन ,फुटबॉल, टेबल इन बास्केटबॉल या व इतर खेळाची सुरुवात केली आहे डॉ.राजेंद्र देशमुख यांनी जिमखाना अंतर्गत सायकलींग क्लब सुरू केले आहे यामध्ये विद्यार्थी व नागरिक सहभाग घेत आहेत

गोविंदाग्रजांनी लिहिल्याप्रमाणे कृष्णेकाठी पूर्वीचे कुंडल आता राहिले नाही त्याचप्रमाणे नीरेकाठी शिरवळ आता पहिले राहिले नाही शिरवळ आता विविध उद्योगांमुळे ,व्यवसायामुळे नावारूपाला येत आहे औद्योगिकीकरणामुळे उद्योजकता वाढीसाठी व तरुणांना रोजगार ,व्यवसाय मिळवून देण्यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे यासाठी गरज आहे ऐतिहासिक संस्कृतीचा वसा व वारसा जपत वर्तमानाचे भान ठेवत भविष्यासाठी आधुनिकतेचे व औद्योगिकीकरणाची कास धरत योजना आखण्याची व ती राबविण्याची‌ शासनकर्त्यांनी व प्रशासनाने तसा दृष्टिकोन ठेवण्याची व त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची तसे झाले तर येत्या काळात शिरवळ जिल्ह्यातील सर्वांग परिपूर्ण औद्योगिक नगरी म्हणून मुख्य केंद्र बनणल्यास आश्चर्य वाटण्याच कारण नाही.

 

डॉ.विजय शिंदे, अध्यक्ष शिरवळ जिमखाना शिरवळ


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!