हरीश्चंद्री येथे भरधाव टेम्पोची ट्रकला समोरासमोर धडक; १९ वर्षीय युवक ठार.
कापूरहोळ:- सातारा–पुणे राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मौजे हरीश्चंद्री (ता. भोर) येथील श्रद्धा हॉटेलसमोर घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सुमारे १.०० वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून साताऱ्याकडे जाणारा टेम्पो (क्र. MH12 JF 5364) चालक अक्षय बापू सकटे (वय २९, रा. धनगरवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) हा भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत असताना रस्त्यावरील मध्यभागी असलेला डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेला. त्यानंतर साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या ट्रकला (क्र. MP09 AL 9308) समोरासमोर जोराची धडक दिली.
या अपघातात टेम्पोमधील श्रेयस बाळू साळवे (वय १९, रा. धावडवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. तसेच फिर्यादी इकरार रमजान मोहमंद (वय १८, मूळ रा. आलापुर, ता. जि. अमेठी, उत्तरप्रदेश; सध्या रा. भिवंडी बायपास, ठाणे) व ट्रक चालक फरीद मोहमद यांना दुखापत झाली आहे. अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत चालक अक्षय सकटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नाना मदने करीत आहे.


