श्री स्वामी समर्थ व्हाटसअप ग्रुप भोर यांच्याकडून विद्यार्थ्यांना पेन वाटप करून शुभेच्छा


मंगेश पवार

श्री स्वामी समर्थ व्हाटसअप ग्रुप भोर व सामाजिक बांधिलकी ग्रुप नसरापूर यांच्या वतीने राजगड–वेल्हे तालुक्यातील विंझर व अंबवणे येथील १२ वीच्या दोन परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पेन वाटप करून शुभेच्छा देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. या पार्श्वभूमीवर केवळ गुलाब फुल देऊन शुभेच्छा देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपयोगी पडेल अशी पेन भेट देण्यात आली. “फुलांपेक्षा भविष्यासाठी उपयोगी वस्तू देऊया” या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

ADVERTISEMENT

परीक्षा केंद्राबाहेर सकाळीच ग्रुपच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना पेन देऊन आत्मविश्वासाने व सकारात्मक दृष्टीकोनातून परीक्षा देण्याचे आवाहन केले. या छोटेखानी पण अर्थपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

या उपक्रमात संतोष कदम (सेवक) यांचा विशेष सहभाग होता. त्यांनी विद्यार्थ्यांना “भीती न बाळगता, शांत चित्ताने आणि पूर्ण तयारीनिशी परीक्षा द्या, यश तुमचेच आहे,” असा संदेश दिला. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच खरी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

या सामाजिक उपक्रमाचे पालक व स्थानिक नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले. भविष्यातही अशाच उपयुक्त व समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!