भोरमध्ये ‘राजकीय महायुद्ध’! फडणवीस व अजितदादांच्या महासभांमुळे शहर तापले”


मंगेश पवार

भोर:- शहरातील नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अक्षरशः पेटले असून मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांकडून शक्तिप्रदर्शनाचा धडाका सुरू असून शहरात येत्या दोन दिवसांत दोन मोठ्या नेत्यांच्या भव्य जाहीर सभा रंगणार आहेत.

 

भाजपकडून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे १ डिसेंबर रोजी दुपारी १.१५ वाजता भोर शहरात जाहीर सभा घेणार आहेत. भाजप नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली असून भोर-राजगड-मुळशीचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची जोरदार तयारी सुरू आहे. भोर शहरात फडणवीसांची ही पहिल्यांदाच सभा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह असून शहरात चर्चांचा जोरदार माहोल आहे.

ADVERTISEMENT

 

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही ही निवडणूक प्रतिष्ठेची मानत पूर्ण तयारी लावली आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महासभा ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह असून मोठ्या प्रमाणावर जनसागर उपस्थित राहील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

 

दोन्ही महत्त्वाच्या सभांमुळे आगामी दोन दिवस भोरमध्ये ‘राजकीय सुपर संडे आणि मंडे’ ठरणार आहेत. मतदारांची नजर कोणत्या सभेला अधिक जनसमुदाय होतो, कोणते मुद्दे गाजतात, आणि कोणाची बाजू अधिक दबदब्यात दिसते याकडे लागलेली आहे.

 

भाजप असो वा राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची मानून सर्व शक्ती झोकून दिली आहे. प्रचारयुद्ध, सोशल मीडिया मोहीम, उमेदवारांचे जनसंपर्क, आणि शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भोर नगरपालिका निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!