छत्रपती शिवाजी विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
मंगेश पवार
सारोळे :- किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 (बुधवार) रोजी संविधान दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व आणि मूल्ये समजावून सांगण्यासाठी अमोल बोबडे यांनी व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले.
यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची किकवी गावातून भव्य रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत संविधान दिनाबाबत जनजागृती केली. रॅलीला संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र निगडे, सामाजिक कार्यकर्ते महेश कोंढाळकर, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यालयात परतल्यावर विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून “संविधान अक्षर” तयार करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यानंतर 26/11 च्या शहीद अधिकारी व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
संविधान दिनानिमित्त विद्यालयामध्ये
रांगोळी स्पर्धा,
संविधान उद्देशिकेचे वाचन,
संविधान शपथ,
सामुदायिक वाचन उपक्रम
यांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलिंद मगर यांनी केले. तसेच सौ. वीर व सौ. दळवी यांनी रांगोळी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही उत्साहाने सहकार्य केले.


