केळवडे येथील कंपनीत धाडसी चोरी; डॉलर, युरो, पाऊंडसह 8.32 लाखांची रोकड चोरी
नसरापूर (प्रतिनिधी): केळवडे (ता. भोर, जि. पुणे) येथील प्रथम टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या खासगी कंपनीत अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी करून तब्बल 8 लाख 32 हजार 495 रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही चोरी दि. 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 ते दि. 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.45 या कालावधीत घडली आहे. कंपनीचे कार्यालय उघडे असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ऑफिसमधील ड्रॉवर फोडून रोख रक्कम लंपास केली.
चोरीस गेलेल्या रकमेमध्ये
4,45,730 रुपये भारतीय चलन,
तसेच परदेशी चलन स्वरूपात
अमेरिकन डॉलर – 2,714 (किंमत ₹2,43,497),
युके पाऊंड – 436.21 (किंमत ₹52,430),
सिंगापूर डॉलर – 155.6 (किंमत ₹10,854),
युरो – 757.50 (किंमत ₹79,984)
अशी एकूण ₹3,86,765 रुपयांची परदेशी रोकड समाविष्ट आहे.
या प्रकरणी संदिप शंकर जाधव (वय 37, व्यवसाय – फायनान्स मॅनेजर, रा. किरकटवाडी, पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निकम करीत आहे.


