नसरापूर परिसरात सिलिंडर स्फोटग्रस्त कुटुंबाला श्री स्वामी समर्थ सेवेकरी ग्रुपकडून मदतीचा हात


मंगेश पवार

भोर तालुक्यातील नसरापूर परिसरातील दीडघर (ता. भोर) येथे काही दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन यमुना रघुनाथ बांदल व दिनेश बांदल यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट ओढावले होते.

 

या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ सेवेकरी व्हाटसअप ग्रुप यांच्या वतीने स्फोटग्रस्त कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन मदतीचा हात पुढे करण्यात आला. यावेळी यमुना बांदल (आजी) यांना किराणा मालाची मदत देण्यात आली. विशेष बाब म्हणजे ही मदत जिल्हा परिषद शाळा, दीडघर–केतकावणे येथील विद्यार्थ्यांच्या हस्ते देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व सेवाभाव रुजवण्याचा सकारात्मक प्रयत्न करण्यात आला.

ADVERTISEMENT

 

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सेवेकरी संतोष कदम यांनी सिलिंडर स्फोटाच्या घटनेची माहिती दिली. समाजातील अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना मदत करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून लहान वयातच सेवाभाव व संवेदनशीलता अंगी बाणवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याच उद्देशाने विद्यार्थ्यांच्या हस्ते मदत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

या प्रसंगी दिनेश बांदल, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मनोज जगन्नाथ इंगुळकर, सेवेकरी संतोष कदम तसेच विद्यार्थी उपस्थित होते. स्वामी सेवेकरी व्हाटसअप ग्रुपच्या या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!