किकवीमध्ये भव्य शालेय बाल विज्ञान मेळावा 46 प्रकल्पांसह विद्यार्थ्यांची उज्ज्वल सादरीकरणे
मंगेश पवार
सारोळे- : किकवी संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी (ता. भोर, जि. पुणे) येथे सोमवार, दि. ८ रोजी शालेय बाल विज्ञान मेळावा व प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी तब्बल ४६ विविध प्रकारचे प्रकल्प व मॉडेल्स मांडून विज्ञानावरील आपली सर्जनशीलता आणि कल्पकता सादर केली. तसेच वक्तृत्व व निबंध स्पर्धा, इको क्लब व प्रहारी गटाचे पोस्टर प्रदर्शनही घेण्यात आले.
कार्यक्रमास किकवी शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र भोसले, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राध्यापक श्रीकांत निकम, राजगड इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉ. एस. के. पवार, प्राध्यापक एम. बी. बनकर आणि बाळासाहेब आर्डे उपस्थित होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापक विनोद राऊत यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल.
प्रमुख पाहुणे श्रीकांत निकम आणि डॉ. पवार यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन करत विज्ञानाची उपयुक्तता समजावून दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षक मुरलीधर जाधवर, राजेंद्र मोरे आणि संजीवनी सुतार यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र मोरे यांनी केले.
या विज्ञान मेळाव्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भिलारे यांनी विज्ञान मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.


