गुढीपाडव्याला शिक्षणाची गुढी उभारून राजर्षी शाहू विद्यामंदिर, आंबेगाव (ब्रु), पुणे यांचा नववर्षाचा उत्साही प्रारंभ.
पुणे :-गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर राजर्षि शाहू विद्यामंदिर, आंबेगाव येथील बालवाडी विभागात शाळेच्या नववर्षाची सुरुवात एक आगळीवेगळी आणि आनंददायी पद्धतीने करण्यात आली. शिक्षण, आनंद, विज्ञान, आरोग्य, आणि यश यांचे प्रतीक म्हणून “शिक्षणाची गुढी” उभारून पहिल्या दिवसाचा श्रीगणेशा करण्यात आला.
या अभिनव संकल्पनेचा प्रस्ताव शाळेच्या शिक्षकांनी मांडला होता. या कल्पनेला संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. अंकलकोटे पाटील, संचालक मा. श्री. उत्तम चव्हाण, तसेच ऑडिटर मा. सौरभ यांचे संपूर्ण पाठबळ लाभले.
मुख्याध्यापिका मा. सौ. मीनल साने, विभाग प्रमुख मा. सौ. राणी पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.
या दिवशी शाळेतील वातावरण उत्सवमय झाले होते. विद्यार्थ्यांसाठी “गोकुळ सेल्फी पॉइंट” तयार करण्यात आला होता, जिथे पालकांनी आपल्या पाल्यांसोबत आनंदाने फोटोसेशन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. मीनल साने यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली.
प्रत्येक विद्यार्थ्याला पेन्सिलवर गुढीची प्रतिकृती देण्यात आली, तसेच खाऊच्या बकेटमध्ये दाण्याचा लाडू वाटप करण्यात आला. मुले हसत-खेलत शाळेत आली आणि आनंदात घरी परतली.
शेवटी मुलांनी एकच घोष मनात बाळगला –
“गुढी उभारू, आनंदाची, विज्ञानाची, आरोग्याची, सत्याची, उत्तुंग यशाची!”
या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरला आणि मराठी शाळांबद्दलचा अभिमानही वाढीस लागला.


