कादवे डोंगरावर अडकलेल्या तरुणाचा थरारक रेस्क्यू! पोलीस व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे दीपेश वर्मा सुखरूप वाचला


 

कादवे (ता. वेल्हा राजगड) परिसरातील डोंगरावर अडकलेल्या एका तरुणाचा थरारक आणि जीव वाचवणारा बचावप्रसंग रविवारी अनुभवास आला. दीपेश वर्मा (वय २१, रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) हा तरुण काल रात्री कादवे येथील डोंगरावर फिरण्यासाठी गेला असताना अंधार, जंगल आणि अवघड भूभागामुळे थेट कड्याच्या मध्यभागी अडकला होता. वर जाण्याचा मार्ग बंद आणि खाली खोल दरी असल्याने तो पूर्णपणे अडकून पडला होता.

 

रात्र झाल्यामुळे आजूबाजूला काहीच दिसत नव्हते. भीतीच्या आणि असहाय्य अवस्थेत दीपेशने मदतीसाठी जोरजोरात आवाज दिला. मात्र रात्रीचा अंधार, दाट जंगल आणि निर्जन परिसर यामुळे त्याचा आवाज कुणापर्यंत पोहोचू शकला नाही. अख्खी रात्र तो कड्याच्या मध्यभागी अडकून काढत राहिला. जीव धोक्यात असल्याची जाणीव असूनही कोणताही पर्याय नसल्याने त्याने स्वतःला सावरत सकाळची वाट पाहिली.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्या परिसरात असलेले स्थानिक नागरिक राहुल ठाकर यांना “बचाव… बचाव…” असा क्षीण आवाज ऐकू आला. परिस्थितीची गंभीरता ओळखून राहुल ठाकर यांनी वेळ न दवडता तात्काळ वेल्हा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा. शेवते साहेब यांना घटनेची माहिती दिली. शेवते  यांनी त्वरित कादवे गावाचे पोलीस पाटील भाऊसाहेब ढेबे यांना कळवून रेस्क्यूची प्रक्रिया सुरू केली तसेच तात्काळ रेस्क्यू टीमला माहिती देण्यात आली.

ADVERTISEMENT

 

माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे उत्तम पिसाळ, अक्षय जागडे, वैभव जागडे यांच्यासह स्थानिक नागरिक राहुल ठाकर, दत्ता जागडे, संजय चोरघे, वैभव भोसले व तानाजी भोसले व पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत कठीण आणि धोकादायक अशा डोंगराळ भागात योग्य समन्वय साधत, खबरदारीने कड्याच्या मध्यभागी अडकलेल्या दीपेश वर्मा याच्यापर्यंत पोहोचण्यात आले.

 

सुमारे काही तासांच्या प्रयत्नांनंतर दीपेशला कड्यातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले. या संपूर्ण कारवाईदरम्यान प्रत्येक पावलावर जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या रेस्क्यू सदस्यांनी धैर्य, कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. बाहेर काढल्यानंतर दीपेशची प्राथमिक चोकशी करून त्याला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

या घटनेमुळे स्थानिक प्रशासन, पोलीस, रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थ यांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. कादवे परिसरात घडलेल्या या थरारक बचावकार्यात सहभागी सर्वांचे नागरिकांकडून कौतुक होत असून, डोंगराळ भागात फिरताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे अध्यक्ष तानाजी भोसले यांनी यानिमित्ताने केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!