न्हावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा
सारोळे :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्हावी येथे समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन/समता दिन व समता सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत न्हावीच्या सरपंच सौ. शितलताई सोनवणे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद सोनवणे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी महेंद्र शामराव सोनवणे, गणेश सतीश सोनवणे, रंजना किसन सोनवणे, शुभांगी किसन सोनवणे, प्रगती शिवाजी सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पुस्तके देऊन गौरविण्यात आले. सन्मान सोहळ्यात सहभागींच्या चेहऱ्यावर आनंद, भावनिक क्षण आणि अभिमान दिसून आला. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी आणि सन्मानाची गरज अधोरेखित करणारा हा उपक्रम सर्वांना भावला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “दिव्यांगत्व ही अडचण नसून योग्य संधी मिळाल्यास प्रत्येक व्यक्ती गुणांनी उजळून निघते” असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. पालक व विद्यार्थ्यांना समान संधी, मानवी हक्क आणि संवेदनशील दृष्टीकोन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शाळेत साजरा करण्यात आलेला दिव्यांग दिन व समता दिनाचा उपक्रम ममत्व, समत्व, बंधुत्व, संवेदना आणि सहजीवनाच्या मूल्यांना बळकटी देणारा ठरला. समाजमनाला जोडणारा आणि सर्वसमावेशकतेचा आदर्श घालणारा हा कार्यक्रम सर्वांकडून प्रशंसनीय ठरला.
भांबवडे गावचे आदर्श युवक लोकेश गुरव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांना आणि विद्यार्थ्यांना गोड जेवणाचा आस्वाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललिता भोसले यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चाचर यांनी प्रभावीपणे पार पाडले तर आभार प्रदर्शन रूपाली पिसाळ यांनी मानले.
हा उपक्रम समाजातील सर्वांना एकत्र आणणारा आणि संवेदनशीलतेची जाणीव वाढवणारा ठरला.


