भोर -कापूरहोळ रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
भोर:- तालुक्यातील आंळदे गावाच्या हद्दीत भोर कापूरहोळ रस्त्यावरील साईट पट्टीवर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार दि. 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे 1.40 वाजण्याच्या सुमारास अमृत लक्ष्मण धावले (वय 27) व सौ. नंदा लक्ष्मण धावले (वय 55, दोघेही रा. तेलवडी, ता. भोर, जि. पुणे) हे स्प्लेंडर मोटारसायकल (MH 12 PV 8069) वरून जात असताना भोर बाजूकडून येणाऱ्या मारुती फॉक्स कार (MH 12 VN 0101) ने त्यांना जोराची धडक दिली.
कार चालक स्वप्नील सुनिल पठारे (वय 37, रा. बी. यू. भंडारी सोसायटी, ए-5 विंग, फ्लॅट नं. 101, तुकाराम नगर, खराडी गावठाण, पुणे) याने आपली कार भरधाव वेगात, निष्काळजीपणे व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून चालविल्याने हा अपघात झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या अपघातात अमृत धावले व सौ. नंदा धावले यांना गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी फिर्यादी संतोष रामचंद्र धावले (वय 47, व्यवसाय शेती/हॉटेल, रा. तेलवडी, ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 487/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1), 125(A), 125(B), 281 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहे.


