ससेवाडीत पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची फसवणूक
५.५८ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; राजगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
भोर तालुक्यातील ससेवाडी येथे पोलीस असल्याची बतावणी करून एका ६५ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी (दि. २४ फेब्रुवारी २०२६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अनोळखी इसमाविरुद्ध राजगड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्री. बाळासाहेब ज्ञानोबा धुमाळ (वय ६५, रा. उत्तम नगर, पुणे) हे ससेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत केंब अँड टॉर कंपनीसमोरील कच्च्या रस्त्याच्या कडेला मोटारसायकल लावून थांबले होते. त्यावेळी मागून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या एका अनोळखी इसमाने स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले.
पुढे चेकिंग सुरू असल्याचे सांगून “दागिने कापडात बांधून खिशात ठेवा” असा सल्ला देत त्याने विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी गळ्यातील सुमारे ८ तोळे ९०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची चेन (किंमत अंदाजे ₹४,५९,१७०) आणि २ तोळे २०० मिलीग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे ₹९९,०००) कापडात बांधण्यासाठी दिली. मात्र आरोपीने दागिने कापडात न ठेवता स्वतःकडेच ठेवून तेथून पसार झाला.
एकूण सुमारे ₹५,५८,१७० किमतीचे सोन्याचे दागिने अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित गुन्हा BNS कलम २०४, ३१८ (४) अन्वये नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रधान करीत आहे.आरोपीचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे


