शाळा परिसरातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका ठरणारी तंबाखू विक्री; राजगड पोलिसांची ७ विक्रेत्यांवर कारवाई”
मंगेश पवार
राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत शाळांच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीररित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी व्यापक कारवाई करत सात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थ जाहिरात प्रतिबंध कायदा २००३ च्या कलम ६ (ब) अंतर्गत ही कारवाई असून, वेळू, ससेवाडी फाटा व शिंदेवाडी या गावांतील शाळांच्या परिसरात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते.
कोणावर झाली कारवाई
कारवाईदरम्यान वेळू येथील सारीका पांगारे, संतोष पांगारे, सोनाली खुंटे व देवा पटेल, ससेवाडी फाट्यावरील निखील गोगावले व लक्ष्मण गोगावले, तसेच शिंदेवाडीतील सागर शिंदे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तंबाखूजन्य पदार्थ जप्त
पोलिसांनी या कारवाईत सिगारेट, बिडी, पान मसाला व विविध प्रकारचा तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे. सर्व जप्त माल पंचनाम्याद्वारे ताब्यात घेण्यात आला असून त्याची एकूण किंमत शेकडो रुपयांची आहे.
कारवाई पुढेही सुरूच
सदर कारवाई पोलीस हवालदार मुंढे यांनी दाखल केली असून तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत. कारवाई प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
राजगड पोलिसांनी नागरिक व व्यावसायिकांना स्पष्ट सूचना दिल्या असून,
शाळा व शिक्षण संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.


