मकर संक्रांतीनिमित्त महिला राजगड पोलीस अधिकारी प्रमिला निकम यांचा सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकतेचा संदेश
सारोळे :- नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती निमित्त राजगड पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार प्रमिला जी. निकम यांनी नागरिकांना, विशेषतः महिलांना, सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
डिजिटल युगात सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा वापर वाढत असताना सायबर गुन्हेगारीचे प्रकारही झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये महिलांना लक्ष्य करून केला जाणारा सेक्स्टॉर्शन हा अत्यंत गंभीर व धोकादायक गुन्हा आहे.
सेक्स्टॉर्शन म्हणजे काय?
सायबर गुन्हेगार फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, डेटिंग अॅप्स किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांवर आकर्षक बनावट प्रोफाइल तयार करून महिलांशी मैत्री करतात. सुरुवातीला विश्वास संपादन करून भावनिक जवळीक निर्माण केली जाते. त्यानंतर खासगी चॅट, फोटो किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला जातो.
अनेक वेळा समोरची व्यक्ती प्रत्यक्ष नसून पूर्व-रेकॉर्डेड व्हिडिओ वापरला जातो. या संभाषणाचे गुपचूप रेकॉर्डिंग करून “हा व्हिडिओ नातेवाईकांना पाठवू”, “सोशल मीडियावर टाकू” अशा धमक्या देत पैशांची मागणी केली जाते. एकदा पैसे दिल्यावर मागण्या वाढत जातात व मानसिक त्रास अधिक तीव्र होतो.
AI आणि फेस चेंज अॅप्सचा वाढता धोका
आजकाल विविध अॅप्सद्वारे चेहरा बदलून अश्लील व्हिडिओ तयार करून महिलांना ब्लॅकमेल केले जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर करून बनावट चेहऱ्यांचे, आवाजांचे व्हिडिओ तयार केले जात आहेत. अशा घटनांना सामाजिक, राजकीय तसेच सामान्य नागरिकही बळी पडलेले आहेत.
अनेक अॅप्स वापरताना गुगल लोकेशन, फोटो गॅलरी, कॉन्टॅक्ट्स यांसारख्या परवानग्या सहज दिल्या जातात. याच माहितीचा गैरवापर करून हॅकर्स नागरिकांचे मोठे नुकसान करत आहेत.
लाज बाळगू नका – तक्रार करा
सेक्स्टॉर्शन हा पूर्णपणे गुन्हा आहे. अशा प्रकारात लाज वाटण्याचे कारण नाही. संशयास्पद व्यक्तींशी ऑनलाईन संपर्क टाळावा, खासगी फोटो किंवा व्हिडिओ शेअर करू नयेत.
तरीही अशा प्रकारची घटना घडल्यास त्वरित सायबर हेल्पलाईन 1930 किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करणे अत्यावश्यक आहे. वेळीच तक्रार आणि जागरूकता हाच सायबर गुन्ह्यांवर प्रभावी उपाय आहे.
“आनंदी रहा, मस्त रहा, सुरक्षित रहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागरूक रहा.”
जयहिंद! जय महाराष्ट्र! पुणे ग्रामीण पोलीस, राजगड पोलीस पोलीस निरीक्षक राजेश गवळी


