भोर तालुक्यात बिबट्याचा धसका; पाचलिंग येथे गायवर हल्ला,
मंगेश पवार
भोर प्रतिनिधी : तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचलिंग आणि मोरवाडी या गावांमध्ये सलग दोन घटनांमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पाचलिंग गावच्या हद्दीत दि. 10 शनिवार दुपारी साडेतीनच्या सुमारास बिबट्याने शेतकरी अंकुश रामचंद्र जाधव यांच्या मालकीच्या गायवर हल्ला केला. गट क्रमांक ४१८ मधील गोट्याजवळ गाय असताना दबा धरून आलेल्या बिबट्याने हल्ला केल्याने गाय गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे याच शेतकऱ्याच्या वासरावर यापूर्वीही बिबट्याने हल्ला केला होता.
दरम्यान, याच तालुक्यातील मोरवाडी गावात दोन दिवसांपूर्वी गाडगे बंगल्याजवळ बिबट्याने एका कुत्र्याला लोकांसमोरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहे.
सलग होत असलेल्या या घटनांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“मानवाचा मृत्यू झाल्यावरच वनविभाग जागा होणार का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याचा धोका अधिक असल्याचे चित्र असतानाच आता भोर तालुक्यातही बिबट्याच्या हालचाली वाढताना दिसत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. शेतात काम करणारे शेतकरी, महिला व लहान मुले यांच्यासाठी ही मोठी जोखीम ठरत आहे.
त्यामुळे पाचलिंग मोरवाडी परिसरात तातडीने
बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावावेत,
रात्रीची गस्त वाढवावी,
नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात,
तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी,
अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वनविभागाकडून वेळेवर उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


