एम्बुलन्समध्येच सुखरूप प्रसूती; आई-बाळ दोघेही सुरक्षित
मंगेश पवार
सारोळे (ता. भोर)
दि. १९ ऑगस्ट –भोंगववी प्राथमिक आरोग्य केंद्रातून करंदी नसरापूर गावातील भारती चव्हाण (वय २६) या गर्भवती महिलेची प्रसूतीची कळा सुरू होत्या. बराच प्रयत्न करूनही प्रसूती होत नसल्याने व बाळाने पोटात मल विसर्जन केल्याने, तेथील डॉक्टरांनी तिला ससून वा भोर ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्याचा सल्ला दिला.
त्यासाठी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिकेला किकवी सबसेंटरमधून कॉल देण्यात आला. हा कॉल इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ. मंदार माळी व पायलट विशाल कदम यांनी स्वीकारला. रुग्ण गाडीत घेतल्यानंतर तिच्या प्रसूतीच्या कळा तीव्र झाल्या. प्रसंगाची नाजूकता ओळखून डॉक्टरांनी शांतता व सावधगिरी बाळगत एम्बुलन्समधूनच सुरक्षित प्रसूती करून दाखवली.
विशेष म्हणजे, बाळाच्या मानेला नाळेचे तीन वेढे होते तसेच पोटात मल होता. अशा कठीण परिस्थितीतही ३.९ किलो वजनाचे निरोगी बाळ सुखरूप जन्माला आले. प्रसंगी पायलट विशाल कदम व आशा वर्कर सुषमा कोंढाळकर यांनी मदत केली.
या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. त्यांनी १०८ आपत्कालीन सेवा तसेच डॉ. मंदार माळी, पायलट विशाल कदम, आशा वर्कर सुषमा कोंढाळकर, तसेच १०८ चे डिस्ट्रिक्ट मॅनेजर डॉ. प्रियांक जावळे, एडीएम सुजित पाटील व एडीएम संतोष येनपुरे यांचे मन:पूर्वक आभार मानले.


