विवाह सोहळ्यातून शिक्षणाला हातभार; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी रु. 10 हजारांची देणगी
सारोळे :- सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देणारा आदर्श उपक्रम किकवी येथे पार पडला. दिनांक 19 जून 2026 रोजी संजय शंकर शेलार (रा. वागजवाडी, ता. भोर, जि. पुणे) यांची कन्या तथा ह.भ.प. कीर्तनकार कु. मृणाली यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री अनिल शंकर शेलार व कुटुंबीय यांनी शिक्षणासाठी विशेष योगदान दिले.
त्यांनी त्यांचे आजोबा कै. श्री शंकर रामभाऊ शेलार तसेच कै. श्री मारुती बाप्पुजी अहिरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी यास रु. 10,000/- (दहा हजार) देणगी प्रदान केली.
सदर रक्कम मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात येणार असून, त्यावरील व्याजातून दरवर्षी इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळणार असून, अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळणार आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद दशरथ राऊत यांनी किकवी शिक्षण संस्था व विद्यालयाच्या वतीने श्री अनिल शंकर शेलार व त्यांच्या कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले. शिक्षण क्षेत्रासाठी दिलेले हे योगदान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उदात्त देणगीमुळे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानाची नवी परंपरा सुरू होणार असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देण्याचा आदर्श समाजासमोर निर्माण झाला आहे.


