पांडे गावाजवळील डेअरीत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मंगेश पवार
भोर तालुक्यातील पांडे गाव परिसरात रविवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गावाशेजारी असलेल्या कन्हैया डेअरीमध्ये हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी डेअरी परिसरात गस्त घालत असताना सिक्युरिटी रक्षकांच्या निदर्शनास बिबट्या आला. अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सिक्युरिटी कर्मचाऱ्यांनी तत्काळ सतर्कता बाळगत इतरांना याबाबत माहिती दिली.
डेअरी ही गावालगत असल्यामुळे बिबट्या अगदी वस्तीच्या जवळ येऊन पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या घटनेनंतर वनविभागाने बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे जंगलात परत पाठवण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.परिसरात बिबट्याची हालचाल वाढल्याने लहान मुले, महिला आणि शेतकरी वर्गामध्ये विशेष चिंता व्यक्त होत आहे.
वन विभागाने लवकरात लवकर पथक पाठवून परिसराची पाहणी करावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


