कडेगावच्या शेतीचा वाद, पाचवडच्या हॉटेलात गजाने मारहाण.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील कडेगाव येथे शेताच्या विहिरीच्या पाण्यावरुन बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन चुलता व त्याच्या दोन मुलांनी लोखंडी गजाने पाचवड येथील साई हॉटेलमध्ये मारहाण केली. या प्रकरणी चार जणांवर भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 मे रोजी दुपारी 4 वाजता पाचवड येथील हॉटेल साई येथे राजेंद्र सुभाष टिके वय 38, रा. कडेगाव हा त्याच्या मित्रासमवेत जेवण करत होता. तेव्हा तेथे त्याचा चुलता भरत विष्णू टिके, त्यांची दोन मुले संदीप भरत टिके आणि सचिन भरत टिके तसेच त्यांचा नातू वैभव संदीप टिके असे चौघे आले. त्या चौघांनी चार दिवसांपूर्वी शेतामध्ये विहिरीच्या पाण्यावरुन बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात धरुन वैभव टिके याने लोखंडी गजाने आणि इतर तिघांनी कळकाच्या दांडक्याने मारहाण केली. यावरुन भुईज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


