लोणंदमध्ये अतिवृष्टीचा कहर: प्रभाग 14 व 8 मध्ये पूर, हलगर्जीपणामुळे दोनांचा मृत्यू.


दिलीप वाघमारे

लोणंद (ता. खंडाळा) येथे सन 2021-22 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 14 व 8 मध्ये अक्षरशः हाहाकार माजला होता. मुसळधार पावसामुळे परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती.

या भीषण परिस्थितीत प्रभाग क्रमांक 14 मधील दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमागे स्थानिक नगरसेवक, नगरपंचायत लोणंदचे तत्कालीन मुख्याधिकारी तसेच बांधकाम विभाग यांच्या हलगर्जीपणाचा मोठा वाटा असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुरातन खेमावती नदी पात्रास जोडणाऱ्या मांग डोह कालव्यालगतच्या ओढ्यावर पूर नियंत्रणरेषा निश्चित करण्यात आली होती. मात्र, याच ठिकाणी स्थानिक नगरसेवकांच्या सहभागातून काही नागरिकांनी पूर नियंत्रणरेषेवरच भराव टाकून अतिक्रमण करत घरे व इमारती उभारल्या. यामुळे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पूरस्थिती अधिक गंभीर झाली.

ADVERTISEMENT

या अतिक्रमणांमध्ये काही आजी-माजी नगरसेवक, स्थानिक पुढारी, शिक्षक तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे चित्र समोर येत आहे.

दरम्यान, गावातील सांडपाणी थेट खेमावती नदी पात्रात सोडण्यात येत असल्याने नदीचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नगरपंचायतीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभारणे बंधनकारक असताना, कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदीत सोडणे हा कायद्याने गुन्हा आहे.

अशा परिस्थितीत नगरपंचायत लोणंदचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) कायदा 1974 तसेच पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 यांचे उल्लंघन केले का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

भविष्यात अशा प्रकारच्या दुर्लक्षामुळे पूर नियंत्रणरेषा धोक्याची पातळी ओलांडून नागरिकांच्या घरांवर संकट कोसळू नये, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!