गावाचा विकास हेच आमचं ध्येय, निवडणूक म्हणजे जनतेचा विश्वास जिंकण्याची प्रक्रिया – चंद्रकांत बाठे.
मंगेश पवार
सारोळे: भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या बूथ कमिटी आढावा बैठकीचे आयोजन कापूरहोळ येथे करण्यात आले. या बैठकीत पक्षाचे इच्छुक उमेदवार चंद्रकांत बाठे यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
बैठकीच्या सुरुवातीला आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटातील संघटनाची मजबुती, बूथनिहाय मतदार संपर्क आणि जनजागृतीसाठी आखण्यात येणाऱ्या रणनितीवर चर्चा झाली.
चंद्रकांत बाठे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले, “निवडणूक म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर गावाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग ठरवणारी प्रक्रिया आहे. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जनतेशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन करावा, कारण विकास हीच खरी निवडणूक आहे.”
या वेळी मतदारांशी संवाद वाढवण्यासाठी पक्षाच्या नव्या अँपचा वापर, बूथनिहाय माहिती संकलनाची पद्धत, आणि सोशल मीडियाद्वारे पक्षाची धोरणं प्रभावीपणे मांडण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीत प्रत्येक बूथ प्रमुखांना जबाबदाऱ्या स्पष्टपणे देण्यात आल्या. प्रचारादरम्यान शिस्त, संयम आणि जबाबदारी यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीचे नियोजन आणि आयोजन चंद्रकांत बाठे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या वेळी गटातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.


