खासदार शरद पवार आज सातारा दौऱ्यावर, कृष्णाकाठावर होणार राजकीय खलबतं


 

शंकर माने पाटण: प्रतिनिधी | खासदार शरद पवार आज (रविवारी) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.

 

 

खासदार शरद पवार आज रविवारी (२२ सप्टेंबर) रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विश्रामगृहात जिल्ह्याचा राजकीय आढावा घेणार आहेत. त्यामुळे थोरल्या साहेबांच्या दौऱ्यात राजकीय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. या दौऱ्याकडं भाजपा आणि अजितदादा गटाचं देखील लक्ष असणार आहे.

कृष्णाकाठावर होणार राजकीय खलबतं

साताऱ्यातील नियोजित कार्यक्रम आटोपून शरद पवार दुपारी थोर विचारवंत दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या रेठरे बुद्रुकला जाणार आहेत. त्याठिकाणी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. रेठरे बुद्रुक हे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचे देखील माहेर आहे. त्यामुळे कृष्णा काठावर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडं कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचं लक्ष लागून आहे.

रेठरे बुद्रुकला राजकीय घडामोडींचा इतिहास

कृष्णाकाठावरील रेठरे बुद्रुक गावाला राजकीय घडामोडींचा मोठा इतिहास आहे. ज्यांना रेठऱ्याचा कार्ल मार्क्स म्हणून ओळखलं जायचं त्या यशवंतराव मोहिते यांच्या रेठरे गावातील कृष्णा कारखान्याच्या अनेक निवडणुका गाजल्या आहेत. २००९ च्या निवडणुकीत कृष्णा कारखान्यात ऐतिहासिक सत्तांतर झालं आणि अविनाश मोहिते या तरुण नेतृत्वाचा उदय झाला. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार जाणार आहेत.

शरद पवारांनी टायमिंग साधलं

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आपल्या बालेकिल्ल्याच्या दौऱ्यावर येत असल्यानं भाजपासह अजितदादा गटाचं त्यांच्या दौऱ्यावर लक्ष आहे. शरद पवारांच्या गटातून कोण अजितदादा गटात जाणार का आणि इतर पक्षातून कोणी शरद पवार गटात प्रवेश करणार का? हे देखील रविवारी स्पष्ट होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!