बहुप्रतिक्षित लिलाव प्रक्रिया अखेर पार पडली
उपसंपादक : दिलीप वाघमारे
सातारा तहसील कार्यालयामार्फत विविध गौणखनिज कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा व साहित्यसामग्रीचा लिलावाची प्रक्रिया पार पडली आहे. यामधून १८ लाख ९३ हजार रुपये जमा झाल्याची माहिती सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांच्या मान्यतेनुसार लिलावाची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती. सदर लिलावात ४ ट्रॅक्टर, ४ ट्रक , ७ ट्रॉली ,१ लोखंडी बोट, ३ लोखंडी यारी मोटारीसह, ३ लोखंडी जाळी यांचा समावेश होता. यामध्ये एकूण १७ वाहनांचा लिलाव करण्यात आला. आणि एका वाहन धारकाने लिलावापूर्वी पूर्ण रक्कम भरल्यामुळे लिलाव निश्चित रक्कम १० लाख ७० हजार होती. परंतु लिलावात प्रत्यक्षात एकूण १८ वाहने मिळून १८ लाख ९३ हजारांची रक्कम जमा झाली आहे. सर्व वाहने लिलावात विक्री झाल्याने तहसील कार्यालय परिसर दंडात्मक कारवाई वाहनमुक्त झाला त्यामुळे पार्किंग व्यवस्था प्रश्न सुटला आहे.
या कामी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अप्पर जिल्हाधिकारी, महसूल उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठिंबा मिळाला. तसेच सुधाकर भोसले यांनी सातत्याने केलेल्या पाठपुरावा आणि बैठकांमुळे सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे तहसिलदार नागेश गायकवाड यांनी सांगितले.