जावली नाट्यगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न ; ह भ प अतुल महाराज देशमुख ( अध्यात्मिक ) ह भ प सौरभ धनावडे (संगीत )पुरस्काराने सन्मानित.
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
जावली ( मेढा ) : मित्रमेळा या सामाजिक संस्थेकडून देण्यात येणारा जावली गौरव पुरस्कार सोहळा हा फक्त तालुक्यापुरता मर्यादित असणारा पुरस्कार सोहळा नसून हा पुरस्कार सोहळा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचाच पुरस्कार सोहळा आहे. असे प्रतिपादन हास्य कलाकार ओंकार भोजने यांनी केले आहे. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून जावली तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मित्रमेळा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी ०५ नोव्हेंबर रोजी जावली गौरव पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मानाचा जावली नाट्यगौरव पुरस्कार हा आंबेघर येथील तुकाराम शेलार यांना मरणोत्तर देण्यात आला तर जावली नाट्यचळवळ पुरस्कार आसनी येथील जावली तरुण नाट्य मंडळाला देण्यात आला.तसेच सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार अजित आपटे, उद्योजक क्षेत्रासाठी शामराव मर्ढेकर, अध्यात्मिक साठी ह.भ.प. अतुल महाराज देशमुख,संगीतसाठी ऐतिहासिक मामुर्डी गावचे वैभव सौरभ धनावडे, साहित्यसाठी बाळकृष्ण शिंदे, कलासाठी विशाल बांदल, कृषीसाठी जितेंद्र कदम, शिक्षणासाठी अण्णासाहेब दिघे, कुमारी प्राची संकपाळ, क्रीडासाठी अमृता जुनघरे तर पर्यावरणसाठीचा पुरस्कार हा आलेवाडी येथील नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्थेला देण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ह.भ.प. प्रवीण शेलार यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर विलासबाबा जवळ यांनी संस्थेच्या नदीस्वच्छता, निसर्गसंवर्धन, समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे कौतुक करत मित्रमेळा संस्थेचे कार्य असेच बहरत राहावे अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी कार्यक्रमात अजिंक्य कलानिकेतन कलामंच सातारा या ग्रुपच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी झालेल्या कार्यक्रमासाठी लेखक निलेश महीगावकर, पत्रकार बंधू,सरपंच परिषदेचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


