आपल्या संस्कृतीचे अनमोल धन जतन करणे ही काळाची गरज -डॉ. सुभाष आहेर


संपादक : दिलीप वाघमारे

लोणंद: भारतीय संस्कृती प्राचीन आहे. या संस्कृतीमध्ये कौशल्य पूर्ण समाज व्यवस्थेची रचना आहे. संत साहित्य वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडले गेले आहे. संतांनी साहित्याच्या माध्यमातून अज्ञानी लोकांना ज्ञानाचा प्रकाश दिला आहे. लोकसंस्कृतीचे उपासक वासुदेव, पिंगळा, चित्रकथी, भराडी, गोंधळी, पोतराज हे संस्कृतीची जपणूक मोठ्या प्रमाणात करतात. आपली उक्ती आणि कृती यातील एकवाक्यता म्हणजे संस्कृती. प्रत्येक व्यक्तीने आपल्या संस्कृतीतील मूल्यांचा आधार घेऊन जीवन जगले पाहिजे, त्यातूनच व्यक्तिमत्व घडत असते. समाजातील लोक संस्कृतीचे उपासक यांची गीते लोक धन आहेत. आजच्या आधुनिक गीतावर उपासकांच्या गीतांचा प्रभाव पाहावयास मिळतो. असे प्रतिपादन श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ येथील मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. सुभाष आहेर यांनी केले.

लोणंद येथील रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथे सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत पारंपारिक वेशभूषा आणि भारतीय संस्कृती या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

ADVERTISEMENT

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “पौराणिक महाकाव्यामध्ये चिरकाल टिकणाऱ्या अनेक प्रेरणादायी गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे. संस्कृतीचा अभ्यास करताना वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारे करावा. साहित्यामधून संस्कृतीचे तसेच जीवनमूल्यांचे दर्शन घडत असते.”

यावेळी व्यासपीठावरती कला विभागाचे उपप्राचार्य भीमराव काकडे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एम. डी. नायकू आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. नायकू यांनी करून दिला. यावेळी महाविद्यालयात पारंपारिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. सुभाष कदम, प्रा. सौ.छाया सकटे, डॉ. दत्तात्रय अनारसे यांनी काम पाहिले. यावेळी महाविद्यालयातील प्रा रामचंद्र कुंभार, डॉ बाबासाहेब सायमोते, डॉ संदीप शिंदे, प्रा. एस. व्ही. गायकवाड, प्रा. रवींद्र सोनवणे प्रा. अनिकेत धायगुडे, प्रा. श्रीकांत शिंदे, प्रा. शुभम जाधव महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पायल घोरपडे आणि प्रा. डॉ. कु. कोकिळा चांगण यांनी केले.मान्यवरांचे आभार प्रा. भीमराव काकडे यांनी मांडले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!