भोरमध्ये रस्त्यांची दुरवस्था; तबरेज खान २३ जूनपासून उपोषणाच्या पवित्र्यात.
दि. 22 भोर, प्रतिनिधी:- शहरातील अपूर्ण आणि चुकीच्या पद्धतीने जोडले गेलेले सिमेंट काँक्रीट रस्ते सध्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेक नागरिक किरकोळ जखमी होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
भेलकेवाडी येथील रहिवासी तबरेज नासिर खान (रा. 660भेलकेवाडी) यांनी या प्रश्नाकडे वारंवार भोर नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे. १० जून २०२५ रोजी त्यांनी लेखी अर्जाद्वारे रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. याआधीही तीन-चार महिन्यांपासून त्यांनी फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटीद्वारे अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात तबरेज खान यांनी २३ जूनपासून भोर नगरपरिषदेसमोर शांततामय उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी भोर पोलीस स्टेशन आणि आमदार शंकर मांडेकर यांनाही दिली आहे.
नागरिकांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून केवळ करवसुलीवर भर देणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे या आंदोलनाला भविष्यात भोरकरांचा मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

			
