भोर तालुक्यातील ग्रामीण भागात एस.टी. बस सेवा सशक्ततेकडे!
शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांच्या पाठपुराव्याला यश
सारोळे (ता. भोर), दि. 1 ऑगस्ट:
भोर तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एस.टी. बस सेवा अधिक सुकर व्हावी यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. गणेश शरदराव निगडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून, पुणे एस.टी. विभागाकडून महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि चाकरमानी वर्गाला दिलासा मिळणार आहे.
मुख्य मागण्या व त्यावरील निर्णय:
१. भोर–वीर मार्गावरील गाड्या भोंगवली मार्गे वळवाव्यात –
११ एप्रिल २०२४ रोजी निगडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार ही मागणी करण्यात आली होती. मात्र महामंडळाने स्पष्ट केले की, भोंगवली मार्गे वळवल्यास भाड्यात सुमारे ₹१० वाढ होईल आणि विद्यार्थ्यांनाही फटका बसेल. त्यामुळे सद्यस्थितीत ही मागणी संयुक्तिक नसल्याने मान्य करण्यात आलेली नाही.
२. भोंगवली–आळंदी विशेष फेरी एकादशीसाठी सुरू!
धार्मिक प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक महिन्याच्या एकादशीस भोंगवली ते आळंदी अशी विशेष एस.टी. बस फेरी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा नागरिकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे.
३. भोर–वाल्हा आणि भोर–जेजुरी मार्गावरील बसेस सुरूच राहणार!
सदर मार्गांवरील बसफेऱ्या सुरु आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वेळेच्या काटेकोर पालनासाठी आगार व्यवस्थापकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागासाठी ‘लालपरी’चा विस्तार – नविन सब-डेपोची आखणी!
मा. गणेश निगडे यांनी पुढे सांगितले की,
“भोर तालुक्याच्या ग्रामीण पूर्व भागात नविन सब-डेपो स्थापन करण्याचा प्रयत्न लवकरच केला जाईल. लालपरी ही सामान्य माणसांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे तिच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणार.”
महामंडळाचा लोकाभिमुख दृष्टिकोन:
वाहतूक विभाग नियंत्रकांनी नागरिकांच्या सहभागाबद्दल आभार मानले असून, भविष्यात नागरिकांच्या गरजेनुसार नवीन बसेस लावल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या निर्णयांमुळे भोंगवली, न्हावी, टापरेवाडी, वाल्हा, वीर, जेजुरी आदी गावांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


