भोर तालुक्यातील निगडे गावात कारवर कोयत्याने हल्ला; शिवीगाळ आणि धमकीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
दि. 2 सारोळे :-निगडे गावच्या हद्दीत भरदिवसा एका शेतकऱ्याच्या कारवर कोयत्याने हल्ला करत शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी किशोर लक्ष्मण बारणे (वय 41, व्यवसाय – शेती, रा. निगडे, ता. भोर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ते स्वतःच्या कारने गावात जात असताना शिवाजी चौधरी यांच्या घराजवळ समोरून येणाऱ्या मोटारसायकलवरील इसम प्रथमेश ज्ञानेश्वर चिकणे आणि ज्ञानेश्वर आनंदा चिकणे (दोघे रा. निगडे) यांनी त्यांना अडवले.
या दरम्यान ज्ञानेश्वर चिकणे याने हातातील लोखंडी कोयता फिर्यादीच्या कारवर मारला, आणि कारण विचारल्यावर दोघांनीही फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी केली. एवढ्यावरच न थांबता ज्ञानेश्वर चिकणे याने कोयता फिर्यादीच्या दिशेने फेकून मारला, मात्र सुदैवाने कोयता त्यांच्या अंगावर न लागताच जमिनीवर पडला. या प्रकारामुळे घाबरलेल्या बारणे यांनी तेथून तातडीने कारने पलायन केले आणि घरी पोहोचून पोलिसांकडे तक्रार दिली.
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 298/2025 अंतर्गत BNS कलम 352, 351(2)(3), 3(5), तसेच शस्त्र कायदा कलम 4, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास नाना मदने करीत आहेत.


