AI तंत्रज्ञानावर आधारित ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजनेचा’ शुभारंभ; भव्य शेतकरी मेळावा व आदर्श शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना’ (AI तंत्रज्ञानावर आधारित) शुभारंभ, भव्य शेतकरी मेळावा व आदर्श शेतकरी सन्मान सोहळा आज गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री मा. ना. बाबासाहेब पाटील होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कृषिमंत्री मा. ना. दत्तात्रयमामा भरणे उपस्थित होते. तसेच माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबरजी दुर्गाडे, संचालक भालचंद्र जगताप, बँकेचे संचालक मंडळ, विविध मान्यवर, पदाधिकारी आणि जिल्ह्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.
या प्रसंगी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम कशी करता येईल, ऊस पिकामध्ये एकरी १५० टनांपर्यंत उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन तसेच इतर पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. या तंत्रज्ञानाच्या अवलंबासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत अत्यल्प व्याजदरात कर्जपुरवठा व उपलब्ध अनुदान योजनांची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा ‘आदर्श शेतकरी’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भोर तालुक्यातील न्हावी येथील प्रगतशील बागायतदार महेंद्र मोहन सोनवणे आणि रेखा महेंद्र सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. ऊस व टोमॅटो पिकांमध्ये आधुनिक व प्रयोगशील शेती पद्धतीचा अवलंब करून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
या कार्यक्रमामुळे आधुनिक तंत्रज्ञानाधारित शेती, सुलभ कर्जव्यवस्था आणि उत्पादनवाढीच्या नव्या संधींबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


