युवकांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना राष्ट्रीय सेवा योजनेने निर्माण केली; -डॉ. सुभाष शेळके


सातारा प्रतिनिधी:  बजरंग चौधरी

राष्ट्रीय सेवा योजना ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी सशक्त साधन आहे. युवकांच्यात निस्वार्थ सेवाभाव, राष्ट्रभक्ती, सेवाभावी वृत्ती विज्ञाननिष्ठा , आणि प्रामाणिकपणा रुजवण्याचे काम या योजनेने केले आहे. राष्ट्राचा भूतकाळ अक्षरबद्ध करून राष्ट्राच्या भविष्याला आकार देण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून युवक करतात. खऱ्या अर्थाने युवकांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना राष्ट्रीय सेवा योजनेने केली आहे. असे उदगार प्रा.डॉ. सुभाष शेळके यांनी काढले.

 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आर्ट्स ,कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज नागठाणे या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभ व एन एस एस दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानपर कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड हे होते.

 

प्रा डॉ सुभाष शेळके आपल्या भाषणात पुढे म्हणाले, एन एस एस चे शिबिर सहजीवन , सहशिक्षण व सहभोजन शिकवतात. यातून सर्वधर्मी समानत्व या भावनेचा विकास होतो. जीवन मूल्यांची जपणूक करण्याचं खरं शिक्षण, सचोटी आणि मनाची मशागत करणाऱ्या विचारांची शिदोरी ही योजना युवकांना देते. अलीकडे युवकांच्या मनावर अंधकार आणि मळभ दाटला आहे. अशावेळी त्यांना प्रकाशाचा झोत होऊन मार्ग दाखवण्याचे काम ही योजना करत आहे.

ADVERTISEMENT

 

राष्ट्रीय सेवा योजना उदघाटन समारंभाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. महेश गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले, भारतातला युवक देश सेवेची जोडला गेला पाहिजे या हेतूने राष्ट्रीय सेवा योजना निर्माण झाली. आज ही योजना युवकांना सामाजिकतेचे भान प्राप्त करून समाजाला उन्नत करण्याचे काम करते. त्यांच्यात नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तुत्व या गुणांचा विकास साधण्याचे काम या योजनेने स्थापनेपासूनच केले आहे.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ संदीप लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.भालचंद्र बिचितकर यांनी केले तर आभार डॉ. सुनील पवार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम समन्वयक प्रा अभय जायभाये,विद्यार्थी सचिव कु. अक्षदा जाधव सर्व प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रीन क्लब यांच्या विद्यमाने स्वयंसेवकांनी तयार केलेल्या ‘स्वच्छता हीच सेवा ‘ या विषयावरील २५ पोस्टर्सचे प्रदर्शन भरवण्यात आले. त्याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!