“सारोळे गार्डन थांबा; बॅगेतून रिव्हॉल्वर पाऊच चोरी “
नाशिकहून गोव्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा रिव्हॉल्वर पाऊच चोरीला गेल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी विक्रांत शिवराय साळसकर (वय ५८, रा. नाशिक) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अमृता गार्डन, मौजे सारोळा (ता. भोर, जि. पुणे) येथे त्यांच्या ट्रॅव्हल्स बसने थांबा घेतला होता. पुढे १४ डिसेंबर रोजी गोव्यातील मडगाव येथे पोहोचल्यानंतर त्यांनी लक्षात घेतले की, त्यांच्या बॅगेचा साईड पॉकेट कापून अज्ञात व्यक्तीने रिव्हॉल्वरचे पाऊच चोरी केले आहे.
या घटनेनंतर फिर्यादींनी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. मात्र, प्रकरणाची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या आदेशान्वये व संबंधित कागदपत्रांच्या आधारे २५ सप्टेंबर २०२५ रोजी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोहवा राहुल कोल्हे पुढील तपास करीत आहे.