उत्तम आहार हीच आयुष्याची गुरुकिल्ली .” – डॉ. महेश साबळे
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मेढा : २९ ऑगस्ट २०२४
“ आपल्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी व जीवनातील ताण-तणाव दूर करण्यासाठी, व आपले आयुष्य सुखकर करण्यासाठी उत्तम आहार म्हणजे आपल्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे. आहारच आपल्याला निरोगी बनवतो “असे प्रतिपादन डॉ.महेश साबळे यांनी केले.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील जिमखाना विभागाच्या वतीने,हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद सिंग यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या भाषणात बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रा.डॉ.प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ साबळे पुढे म्हणाले की,” आरोग्य म्हणजे मला कोणताही आजार नाही असा त्याचा अर्थ नसून, आपली शारीरिक व मानसिक स्थिती सदृढ असणे म्हणजे आरोग्य होय. हेच आरोग्य सर्वगुण संपन्न रहावे यासाठी आपण फास्ट फूडचा आहारात वापर न करता आपल्या पचनी पडेल असेच अन्न सेवन करावे. दिवसभर जितका आहार लागतो तो तीन टप्प्यात घ्यावा, तरच आपले शरीर सदृढ बनेल तसेच मानसिक संतुलन नीट राहण्यासाठी आपल्याला मोबाईल, टीव्ही, युट्युब, इंस्टाग्राम व मोबाईलचा अतिरेकी वापर टाळावा म्हणजे आपले मानसिक आरोग्य सुस्थितीत राहिल. हाच आपले आयुष्य सुखी करण्याचा मंत्र आहे असे मी मानतो “असे मत व्यक्त करून त्यांनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली.आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.प्रमोद घाटगे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व सांगून विध्यार्थ्यांनी यावयात पोषक आहार घेऊन आपले आरोग्य सदृढ ठेवावे तसेच मोबाईलचा वापर कमी करावा असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिमखाना विभागाने सुरु केलेल्या स्पोर्ट्स बुलेटिन भित्तीपत्रकांचे उदघाटन महाविद्यालायचे उपप्रचार्य आणि डॉ.महेश साबळे यांचे हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंग यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिमखाना विभाग प्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मेजर ध्यानचंद सिंग यांनी केलेल्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची माहीती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. आनंद साठे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी करून दिला.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी डॉ.उल्हास जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.


